College Reopen : शाळांपाठोपाठ सोमवारपासून महाविद्यालये होणार सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यात येत्या सोमवारपासून विद्यापीठे आणि महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस होणे आवश्यक आहे. तर शहराबाहेरील किंवा परराज्यातील विद्यार्थ्यांना कोरोना RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादा म्हणाले, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. याठिकाणी संपुर्ण जिल्ह्यातून व राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याकरिता बाहेरून विद्यार्थांना दोन डोस सोबत RTPCR तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे तसेच मॅनेजमेंट शाखेची जवळपास 900 महाविद्यालये आहेत. येत्या सोमवारपासून ही सर्व महाविद्यालये खुली होणार आहेत. लोणावळा व मावळातील देखील सर्व महाविद्यालये या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहेत. तब्बल दिड वर्षानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयांचे वर्ग व काॅलेज कट्टा गजबजणार आहे.
पर्यटनस्थळे देखील होणार खुली
कोरोना कमी होऊ लागल्याने महाविद्यालयांच्या सोबत पुणे शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे देखील पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच हाॅटेलांची रात्रीची वेळ देखील एक तासाने वाढवत 11 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.