Breaking news

भोसरीचे दादा म्हणतात पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करा तर मावळचे आप्पा म्हणतात जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा !

मावळ माझा न्युज : पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थगिती दिलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनात केल्याने पवना बंदिस्त जलवाहिनीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मावळातील शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी आज मावळ भाजपाचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी पुन्हा तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड भाजपाचे नेते व मावळ भाजपाचे नेते यांच्यात तू तू मै मै पहायला मिळाली होती. आता पुन्हा पिंपरी चिंचवड भाजपा व मावळ भाजपात पवना जलवाहिनी प्रकल्पावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 

    पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास सुरवातीपासूनच मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध होता व आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी व भारतीय किसान संघ, शिवसेना, आरपीआय यांच्या वतीने तत्कालीन सरकारच्या विरोधात दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बऊर फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी बांधव त्यावेळी शहीद झाले. तर काही शेतकरी जखमी झाले होते. ही बाब शासनाने गांभीर्यपूर्वक लक्षात घेऊन तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पास स्थगिती देण्याचे आदेश दिले. ते आजतागायत कायम आहेत. या प्रकल्पाला मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्ध करावा अशी मागणी मावळ भाजपा कायम करत आहे. असे असताना पिंपरी चिंचवड भाजपा मात्र हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित व्हावा याकरिता आग्रही आहे. यामुळे मागील 12 वर्षापासून स्थगिती आदेश असताना देखील हा प्रकल्प रद्द झालेला नाही.    

        दरवर्षी 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस मानत मावळात शहिद शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहत प्रकल्प रद्दची मागणी सर्वपक्षीयांकडून केली जाते. त्यावेळी प्रकल्पाच्या विरोधात असलेली भाजपा व शिवसेना मागील पंचवार्षिक काळात सत्तेत होती व आता देखील सत्तेत आहे. मग हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय का घेतला जात नाही. मावळातील शेतकर्‍यांचा अंत पाहण्याचा हा प्रकार आहे. महेश दादा लांडगे यांनी ऐन क्रांती दिनाच्या पंधरा दिवस अगोदर सदरचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मुद्दा लक्षवेधी मध्ये मांडल्याने मावळ भाजपा पुन्हा आक्रमक झाली आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मावळ भाजपाचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी दिला आहे.

इतर बातम्या