Lonavala Crime News l लोणावळ्यात नांगरगाव येथील सोसायटीमध्ये धाडसी घरफोडी; १८ लाखांचा मुद्देमाल लंपास
लोणावळा : पर्यटननगरी लोणावळ्यातील नांगरगाव परिसरात एका बंगल्यात 29 एप्रिलच्या मध्यरात्री ते पहाटे दरम्यान धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने खिडकीतून प्रवेश करत तब्बल १७ लाख ९५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांगरगाव येथील 'संविधान' बंगल्यात राहणाऱ्या सौ. अनिता बाळू गायकवाड (वय ४४) यांच्या घरात ही चोरी झाली. २९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३:३० ते ५:४५ च्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या हॉलच्या खिडकीवाटे आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले ५०० रुपये दराच्या नोटांचे १८ बंडल (एकूण ९ लाख रुपये). सोन्याचे दागिने: ६.५ तोळ्याचे मोठे मंगळसूत्र (किंमत अंदाजे ६.५ लाख रुपये), सव्वा तोळ्याचे लहान मंगळसूत्र (१.२ लाख रुपये), ५ ग्रॅमची सोन्याची पोत (५० हजार रुपये) आणि ७ ग्रॅमची सोन्याची चैन (७५ हजार रुपये) असा एकूण १७ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फिर्यादी अनिता गायकवाड यांच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या सर्वत्र लग्न सोहळे व धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. याचा फायदा घेत चोरटे घरफोड्या व दागिने चोरीच्या घटना करत आहेत तरी नागरिकांनी सतर्क रहावे व मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात असे आव्हान करण्यात येत आहे.





















