Breaking news

दुर्दैवी! लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाचा घाला; गणपती विसर्जनासाठी गेलेल्या बापलेकाचा दगडी खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यातील बेडसे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या बापलेकाचा दगडी खाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. लाडक्या बाप्पाला निरोप देताना खाणीत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्याने बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बेडसे गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (दि. 12) रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

     संजय धोंडू शिर्के (वय-48) व हर्षद संजय शिर्के (वय 21, रा. बेडसे, मावळ) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत. वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मावळ या आपत्कालीन पथकाला दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

     कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सर्वत्र गौरी गणपती विसर्जनासाठी लाडक्या बाप्पाला भक्तिभावात निरोप देत असताना मावळातील बेडसे गावात गणपती बुडवताना घडलेल्या दुर्घटनेने ऐन उत्सवात गावावर शोककळा पसरली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत घराजवळील खाणीत घरातील गणपती बुडवण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वत्र हर्षाचे वातावरण असताना या दुर्घटनेने मात्र शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गणपती बुडवण्यासाठी हर्षद हा पाण्यात उतरला. परंतु दीर्घकाळ तो बाहेरच न आल्याने त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याची खोली जास्त होती. दोघांनाही याचा अंदाज न आल्याने त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत दोघांना बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मावळ या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. आपत्कालीन पथकाला दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत. 

इतर बातम्या

संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा ग्रामीण व शहर भागात पोलिसांची कारवाई; 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटख्यासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त