लोणावळ्यात आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
लोणावळा : आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आमदार सुनील शेळके यांची लोणावळ्यात जनसंवाद यात्रा पार पडली. ही यात्रा भांगरवाडी या ठिकाणी आलेले असताना आमदार सुनील शेळके हे भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. त्याच ठिकाणाहून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवत शुभारंभ होणार होता.
आमदार सुनील शेळके यांची जनसंवाद यात्रा ही भांगरवाडी येथे दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येणार होती. मात्र तिला उशीर होऊन ती पाच वाजता त्या ठिकाणी पोचली. पाच वाजता ही वेळ बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराची देण्यात आलेली होती. बापूसाहेब भेगडे यांचे कार्यकर्ते हे श्रीराम मंदिराच्या पटांगणात उभे असताना त्याच वेळी अचानक आमदार सुनील शेळके हे त्यांच्या समर्थकांसह श्रीराम मंदिरात दर्शनासाठी आले. व पुन्हा माघारी जाताना त्यांचे कार्यकर्ते जोर जोरात घोषणा देऊ लागले, यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असल्याचा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांचा आरोप आहे. आमदार सुनील शेळके यांची जनसंवाद यात्रा पुढे गेल्यानंतर बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडत जोपर्यंत आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रचार सुरू न करण्याची भूमिका घेत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. अखेर पोलीस प्रशासनाकडून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरची प्रचार रॅली सुरू करण्यात आली. रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासीर शेख यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.