Breaking news

Lonavala Big News : लोणावळ्यातील 10 घरफोड्या उघड; अट्टल चोरटे गजाआड

लोणावळा परिसरातील पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरात प्रवेश करून केल्या होत्या घरफोड्या

लोणावळा : लोणावळा शहरात 9 व ग्रामीण भागात 1 अशा दहा घरफोड्या उघडकिस आल्या असून मुद्देमालासह आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      लोणावळा परीसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी व राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे स्वतःची घरे आहेत तर काही पर्यटक भाडेतत्वावर घरे घेवून राहतात. पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उप विभागाची गुन्हे आढावा बैठक घेत तपास पथक तयार करत तपासाला सुरुवात केली होती.

     स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा परिसरात आपला वावर वाढवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास सुरू केला असता, सदरचे गुन्हे  रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम सलाऊद्दीन चौधरी (वय 27 वर्षे रा. वाकसाई, वरसोली लोणावळा ता. मावळ जि. पुणे) हा असल्याची माहिती समोर आली. त्याला तपासकामी ताब्यात घेवून तपास केला असता, त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी वसीम हा उघडया दरवाजावाटे, स्लायडींग खिडकी द्वारे, घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीचे काही गुन्हयात त्याचा साथीदार  सलीम सलाऊद्दीन चौधरी (वय 21 वर्षे रा. लोणावळा ता मावळ जि पुणे),  शहारूख बाबू शेख (वय 21 वर्षे रा. लोणावळा ता मावळ जि पुणे) यांचा सहभाग असल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून सोन्याच्या दोन अंगट्या, दोन डायमंडच्या अंगठया, एक सोन्याची अंगठी, दोन मोटार सायकल, रोख रक्कम असा एकूण 2,26,700/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

      आरोपी वसीम चौधरी हा सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून इतर दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. आरोपी वसीम चौधरी या आरोपीवर यापुर्वी आठ घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपीकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. लोणावळा परीसरात राहणारे लोक तसेच येणारे पर्यटकांनी रात्रीचे वेळी तसेच फिरण्यासाठी बाहेर पडताना आपआपले घरांचे दरवाजे-खिडक्या व्यवस्थीत लॉक करावेत. दरवाजा खिडकी उघडे ठेवून झोपू नये, तसेच स्लायडींग खिडक्यांना लोखंडी प्रिल लावावेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावणेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अंकित गोयल तसेच लोणावळा उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी आवाहन केले आहे. 

     सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, पोसई प्रदीप चौधरी, सफो प्रकाश वाघमारे, पोहवा राजु मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पोना बाळासाहेब खडके, भोईटे, अमोल रोडगे, पोकाॅ मंगेश भगत, प्राण येवले, तुषार भोईटे, काशिनाथ राजापूरे, हवा शकील शेख यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत. 

इतर बातम्या