Breaking news

मावळ मतदार संघातील अंतरंग; काय घडलंय काय बिघडलंय !

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेच्या जागेसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे पक्षाचे श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असल्याने मतदार संघाच्या स्थापनेपासून येथे शिवसेनेचा खासदार आहे. व त्यापूर्वी देखील दोन वेळा शिवसेनेचाच खासदार होता. आता मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेनेचे दोन गट पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड घडवून आणत भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे यांची साथ सोडली होती. बारणे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी येथील शिवसैनिक हे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोबत राहिले आहेत. 

     लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मावळ लोकसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला कायम ठेवली. त्यावेळी अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला व पुढील काही दिवसात त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुती मध्ये मात्र उमेदवारी वरून मोठी रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांनी या जागेवर दावा करत खासदार श्रीरंग बारणे हे मागील दहा वर्षात मतदार संघात काम करण्यात कसे अपयशी ठरले आहेत, याचा लेखजोखा मांडायला सुरुवात केली. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सोडली नाही. त्यांच्या अपयशाची फाईल तयार करत ती थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे देत त्यांना उमेदवारी देऊ नये असा जोरदार युक्तिवाद केला. दुसरीकडे मावळ लोकसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार हे भाजपचे असल्याने मावळ लोकसभेची जागा भाजपला मिळावी याकरिता मावळ, पिंपरी व पनवेल भाजपाने जोर लावला. मेळावे घेतले, राज्यातील व दिल्लीतील बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मावळ लोकसभा मतदार संघात मोठे शक्ती प्रदर्शन करत भावी खासदार असा उल्लेख असलेले मोठ मोठे फलक सर्वत्र लावले. खासदार बारणे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या काहीच दिवस अगोदर मावळ भाजपच्या सर्व पदाधिकारी यांची बैठक तळेगावात झाली. त्यावेळी बहुतांश सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागील पाच वर्षात खासदार बारणे यांनी भाजपला विश्वासात घेणे तर सोडा, साधे विचारले देखील नाही. कायम पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अपमानीत केले असा संताप व्यक्त करत यावेळी काही झाले तरी बारणे यांचे काम करणार नाही अशी भूमिका मांडली. मात्र त्यामुळे राज्यात इतर जागांवर परिणाम होत असल्याने वरिष्ठांनी याबाबत उघड चर्चा न करण्याची तंबी कार्यकर्त्यांना दिली होती.    

           खरंतर मावळ लोकसभा मतदार संघात भाजपा व राष्ट्रवादी या दोन पक्षाची ताकद असताना देखील खासदार बारणे यांनी जोर लावत अखेर मावळ लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र तोपर्यंत खूप पाणी पुलाखालून वाहून गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्यावर वारंवार होत असलेला गद्दारीचा आरोप व महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही महत्वाच्या पक्षांनी केलेले निष्क्रियतेचे आरोप पुसून वाटचाल करणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले आहे. बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्यावर निष्क्रिय खासदार असे थेट आरोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार व भाजपचे माजी आमदार दोघेही बारणे हे कसे चांगले आहेत याचे गुणगान गावू लागले आहेत. जे आरोप केले ते उमेदवारी मिळण्यापूर्वीच होते आता उमेदवारी जाहीर झालीये आता जे पूर्वी बोललो होतो ते विसरून जा असे दोन्ही नेते मतदार व आप आपल्या कार्यकर्त्यांना सांगू लागले आहेत. 

        हे सर्व सुरू असताना संजोग वाघेरे हे मात्र मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेत, त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांना पुढील पाच वर्षांत विकास कामे करून दाखवण्याचे आश्वासन देत होते. मावळ लोकसभा मतदार संघात वाघेरे यांचा मोठा नाते परिवार आहे. त्यापैकी अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व भाजपात पदाधिकारी आहेत. वाघेरे हे नात्यागोत्याचे राजकारण करत असल्याने बारणे यांनी पत्रकार परिषद घेत मतदार संघातील 25 लाख मतदार माझे नातेवाईक आहेत असे सांगून टाकले. त्यानंतरचा टायमिंग साधत वाघेरे यांनी एका लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आर्शिवाद घेतले.

       भाजपकडे बारणे यांना का निवडून द्यायचे हे सांगण्यासाठी मतदार संघातील एकही मुद्दा नसल्याने ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांना मतदान करा असा प्रचार करू लागले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळके यांनी मतदार संघात केलेल्या कामांच्या जोरावर बारणे यांना मते मागायला सुरुवात केली आहे. मात्र बारणे यांनी दहा वर्षात मतदार संघात कोणती ठोस काम केले, केंद्राशी निगडित असलेले कोणते प्रश्न सोडविले, कोणते नवीन प्रकल्प व उद्योग व्यवसाय आणले. कोरोना पासून बंद असलेल्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे व लोकल सेवा पूर्ववत केली का ? याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. मागील दहा वर्ष ज्यांना विश्वासाने निवडून पाठविले त्यांनी आमच्यासाठी काय केले असा प्रश्न 2024 च्या निवडणुकीत तरुण मतदार विचारू लागला आहे. राष्ट्रवादी व भाजपचे नेते मंडळी उसने आवसान आणून प्रचार करत असेल तरी कार्यकर्ते तुमच्या वेळेस आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू पण आता आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या असे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यातच स्थानिक मावळातील नेत्यांवर अविश्वास दाखवत केंद्रातील सहा जणांचे एक पथक मावळ मतदार संघात येऊन बसले आहे. स्थानिक मावळातील नेते यांना दिल्लीवरून दम देण्यात आला आहे. कामाचे मूल्यमापन सुरू आहे. जो चांगले काम करेल त्यालाच पुढे संधी दिली जाईल असे आमिष दाखविले जात आहे वेळ प्रसंगी धाक देखील दाखवला जात आहे. त्यामुळे ज्यांना विधानसभा,  जिल्हा परिषद, नगराध्यक्ष ही पदे मिळावी अशी आशा आहेत ते कामाला लागले आहेत. 

     2014 व 2019 साली राष्ट्रीय मुद्द्यावर मतदान करणारे मतदार आता मात्र स्थानिक मुद्द्यावर बोलत आहेत. मागील दहा वर्षातील कामाचा हिशोब मागत आहेत. हाताला काम नसल्याने बेरोजगारीमुळे युवक हताश झाले आहेत, शेतकरी शेती मालाला हमीभाव नसल्याने चिंतेत आहे व महिला महागाईने हैराण झाल्या आहेत. मात्र त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश येत असल्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय मुद्दे पुढे करत वेळ मारून नेण्याची जुनी पद्धत वापरली जात असल्याचे चित्र प्रचारा दरम्यान पहायला मिळत आहे. एवढे करून देखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मोठ मोठ्या नेत्यांच्या सभांचा रतिप मतदार संघात लावण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड सकल मराठा समाजाने संजोग वाघेरे यांना पाठिंबा देत घाटाखाली बारणे यांचा करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे. येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानात मतदार राजा श्रीरंग बारणे यांचा धनुष्यबाण की संजोग वाघेरे यांची मशाल यापैकी कोणत्या चिन्हाला मतदान करणार व मावळ लोकसभेत कोण बाजी मारणार हे 4 जून रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ही लढत शिवसेना विरुध्द शिवसेना अशी असल्याने विजयी उमेदवार हा शिवसेनेचाच असणार आहे.

इतर बातम्या