Breaking news

चर्चा तर होणारच | अख्खी प्रशासकीय यंत्रणा झटली तरी देखील मतदानाची टक्केवारी घटली; मावळ लोकसभा मतदारसंघात 52.9% मतदान

मावळ माझा न्युज नेटवर्क : लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटल्याने चौथ्या टप्प्यात मतदान वाढावे याकरिता अख्खी प्रशासकीय यंत्रणा झटली होती तरी देखील मतदानाची टक्केवारी घटली असल्याचे चित्र पुणे जिल्ह्यातील मावळ शिरूर व पुणे या तीनही मतदार संघात पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून देखील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. महाराष्ट्रामध्ये मागील काही काळापासून राजकारणामध्ये सातत्याने होत असलेल्या राजकीय उलथापालती, यामुळे मतदान कोणाला करायचे हा मतदारांसमोर एक मोठा प्रश्न असल्याने व जनमानसांच्या मतांचा आदर नेतेमंडळी करत नसल्याने अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांना ही बाब विचार करायला लावणारी आहे.

      लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक असली तरी यामध्ये विकासाच्या मुद्द्यांऐवजी स्थानिक पातळीवर एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करण्यात आले राजकीय नेते मंडळी हे स्थानिक प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याने सर्वसामान्य मतदारांचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांवर रोष असल्याचे या मतदानाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाच्या वतीने व स्थानिक प्रशासनाकडून मतदान वाढावे याकरिता मागील दीड महिन्यापासून सातत्याने जनजागृती करण्यात येत होती तरी देखील या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. आज चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दुपारनंतर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत तसेच मावळ मतदार संघामध्ये पावसाने हजेरी लावली. याचा देखील परिणाम काही अंशी मतदानावर झाला आहे.

      मतदानाचा टक्का घसरल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 25 लाख 85 हजार 018 मतदारांपैकी 13 लाख 67 हजार 475 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य बॅलेट मशीन मध्ये बंद केले आहे. 4 जून रोजी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने आपलाच उमेदवार विजयी होणार या बाबतचे दावेप्रति दावे केले जात आहेत.

इतर बातम्या