Breaking news

Lonavala News | वलवण नांगरगाव रोडवरील इंद्रायणी नदी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा

लोणावळा : वलवण नांगरगाव मार्गावरील इंद्रायणी नदी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी लोणावळाकर नागरिक करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्याशी संपर्क साधला असता 31 मे पर्यंत सदर पुलाचे काम पूर्ण होऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे म्हणाले इंद्रायणी नदीवरील फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन वेळा लेखी पत्र दिले आहे. 

      पावसाळा संपल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी वलवण ते नांगरगाव दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याकरिता या मार्गावरील सर्व वाहतूक ही सुरैय्या रोड, बापदेव मंदिर या भागातून वळवण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी तो मार्ग पर्यायी म्हणून वापरला असला तरी पावसाळ्यामध्ये वलवण नांगरगाव रस्ता हाच या भागातील नागरिकांसाठी रहदारीचा मध्यम मार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 मे पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करावे व तो नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

नांगरगाव येथे औद्योगिक वसाहत असून या ठिकाणी काम करणारे कामगार हे बहुतांश वलवण, वरसोली, वाकसई, कार्ला या भागातून येत असतात. या सर्व कामगारांना व नागरिकांना सदरचा रस्ता बंद असल्याने बाप देव मंदिर रोड येथून वळसा घालून यावे लागते. नांगरगाव भागामध्ये येणारे दुग्ध व्यवसाय व या भागातून शाळेमध्ये जाणारे शाळकरी विद्यार्थी या सर्वांनाच सदरचा पूल बंद असल्याने मोठा वळसा घालून ये जा करावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होणे हे सर्व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय ध्यानात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने जलद गतीने काम करत ते पूर्ण करावे अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राठोड म्हणाले, काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. काल मी स्वतः या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. 31 मे पर्यंत हे काम पूर्ण होईल. पुलाच्या सहा मोर्‍यांपैकी तीन मोर्‍यांचा स्लॅप पूर्ण झाला आहे. उर्वरित तीन मोर्‍यांचे कॉलम तयार झाले असून त्यावर येत्या आठवड्यामध्ये स्लॅब टाकत रस्त्याचे पुलाचे काम पूर्ण होईल. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करून आम्ही पूल वाहतुकीसाठी खुला करू असे त्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या