Breaking news

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा | तब्बल 20 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजली श्री एकवीरा विद्या मंदिर शाळा

लोणावळा : 2004 - 05 साली इयत्ता दहावी मध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते. वीस वर्षांपूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने आज एकविरा विद्या मंदिर शाळा गजबजली असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले. ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो. असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावे, सोबत शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्यात. या संकल्पनेमधून 2004 - 2005 या वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.

     माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात व आनंदामध्ये पार पडला. एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा शिक्षक वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटे मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. या समारंभासाठी शाळेचे तत्कालीन प्राचार्य संजय वंजारे, इयत्ता दहावीला अध्यापन करणारे माजी अध्यापक रामभाऊ पोटे, दशरथ ढमढेरे, विलास येवले, छाया मोरे, सुनिल बोरुडे, शहादेव जाधव, काकासाहेब भोरे, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, मधुकर गुरव, बाबाजी हुलावळे हे उपस्थित होते. या सर्व शिक्षकांचे औक्षण करत त्यांचे शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वीस वर्षांपूर्वी जेव्हा हे माजी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत होते, त्या काळात शाळेच्या आजूबाजूला असलेल्या लहान - सहान दुकानांमध्ये मिळत असलेला बोरकुट, चिंच, सागर मलाई चॉकलेट या खाद्यपदार्थांची शाळेमध्ये पद्धतशीरपणे मांडणी करण्यात आली होती. ही मांडणी व खाद्यपदार्थ पाहून विद्यार्थी खऱ्या अर्थाने वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये रमले होते. शाळेची घंटा वाजवून व राष्ट्रगीत म्हणत या एक दिवसीय शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सध्या मी कोण या सदरामधून प्रत्येकाने आप आपली ओळख करून दिली. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काही उपयोगी अशा भेटवस्तू दिले आहेत. शालेय तासिकांप्रमाणेच दुपारची मधली सुट्टी झाली या सुट्टीमध्ये सर्वांनी डबा खाण्याचा आस्वाद देखील घेतला. दुपारी पुन्हा शाळा भरल्यानंतर संगीत खुर्ची घेत एकदिवसीय शाळेची सांगता शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करून करण्यात आली.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायखे, सुवर्णा भानुसघरे, कैलास हुलावळे, राखी शेलार यांनी केले. सदरचा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी 2004 - 05 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

इतर बातम्या