Breaking news

मावळ लोकसभेसाठी 14 लाख 18 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; मावळात लाट कोणाची परिवर्तनाची की मोदींची

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी 13 मे रोजी 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी 54.87 टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानामध्ये पाच टक्क्यांनी घट झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 लाख 85 हजार 018 एवढे मतदार आहेत. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानासाठी जनजागृती करण्यात येत होती. तसेच या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे पाटील, महायुतीच्या वतीने श्रीरंग बारणे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी व इतर उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील मतदानामध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही. अस्थिर राजकारणामुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत असलेला निरुत्साह यामधून दिसून येत आहे.

     मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर तीन ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. प्रामुख्याने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील व महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यामध्ये थेट लढत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघामधून हॅट्रिक साठी मत आजमावत आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवड येथील माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी दंड थोपटले होते. मागील दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना अपेक्षित विकास कामे या मतदारसंघांमध्ये न झाल्याने व सर्वसामान्य मतदार व पदाधिकारी यांच्याशी समन्वयाचा अभाव राहिल्याने खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधामध्ये एक सुप्त लाट निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी या मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी यांनी जोरदार प्रयत्न केले. हे करत असताना खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर काही प्रमाणात आरोप देखील करण्यात आले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर केलेले आरोप बाजूला ठेवत आता महायुती म्हणून काम करण्याची जाहीर केले. प्रत्यक्ष प्रचारात देखील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. मात्र काही प्रमाणामध्ये कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार संघामध्ये पहायला मिळाले. यामुळे नेते एक बाजूला व मतदार दुसऱ्या बाजूला असे जे चित्र निर्माण झाले होते ते निकालावर परिणाम करणारे असणार आहे.

        श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चित्रा वाघ यांच्यासह अनेक नेते मैदानात उतरले होते तर संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेते रिंगणात उतरले होते. मोठमोठ्या सभा झाल्या शहरी भागांमध्ये नगरपालिका निवडणुका असल्यासारख्या घरोघरी जाऊन पत्रके वाटप करत प्रचार करण्यात आला. ग्रामीण भागात मात्र तितकीशी यंत्रणा पोहोचली नाही. तरी देखील ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला आहे, ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत मतदान केले. मराठा, मुस्लिम व दलीत समाजाने या निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान केले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण व पनवेल या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मशालीचा जोर असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मतदार संघात आढावा घेताना शहरी भागामध्ये धनुष्यबाण व ग्रामीण भागात मशाल असे काहीसे चित्र ऐकायला व पाहायला मिळाले. शेवटच्या दोन दिवसात काही भागांमध्ये लक्ष्मी पुत्रांचे आगमन झाले होते. त्यामुळे मावळ मतदार संघात श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक होणार की संजोग वाघेरे यांच्या रूपाने परिवर्तन घडणार हे मात्र 4 जून रोजी समजणार आहे.

     मावळ लोकसभेसाठी पनवेल विधानसभा मतदारसंघांमधून 2,95,973 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातून 1,89,853 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून 2,14,169 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून 2,06,949 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून 3,22,700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 1,88,795 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. 

       मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व 33 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी बॅलेट मशीनच्या माध्यमातून ईव्हीएम मध्ये बंद केले आहे. 4 जून रोजी मतदार राजाने कोणाला कौल दिला हे समजणार आहे. सध्या मात्र विविध राजकीय चर्चा, तर्क वितर्क व गणिते मांडली जात आहेत. महायुतीच्या वतीने मोदी लाट अजून ओसरली नसल्याने श्रीरंग बारणे हे किती मतांच्या फरकाने निवडून येतील याबाबत सांगितले जात आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लाट पसरली असून संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित असल्याबाबत सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडी व इतर प्रादेशिक पक्ष तसेच अपक्ष उमेदवार हे मतदारांनी साथ दिल्याने आपलाच विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत. लोकशाहीमध्ये शेवटी मतदार हा राजा आहे व हा मतदार राजा आपले मतदान रुपी दान कोणाच्या पदरात टाकतो हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या