Breaking news

लोणावळा नगरपरिषदेकडून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग; आता पॅचवर्क चे काम लवकर मार्गी लावा

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेकडून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग आला आहे. लोणावळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शहरातील नदीपात्र व नाले यांची स्वच्छता करणे क्रमप्राप्त असते. पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये लोणावळा शहरात पावसाला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मे महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील सर्व नाले व शहरामधून वाहणारी इंद्रायणी नदी या मधील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वलवन स्मशानभूमी व कैलास नगर स्मशानभूमी या इंद्रायणी नदीपात्राच्या दोन्ही टोकांकडून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम एकाच वेळी हाती घेण्यात आले आहे. तसेच नदीपात्राला येऊन मिळणारे लहान व मोठे नाले हे देखील साफ करून घेण्यात आले आहेत पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात कोठेही नदी नाले सफाई अभावी पाणी साचण्याच्या घटना घडवून येत याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले.

    लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते खड्डे देखील तात्काळ बुजवून घेऊन त्या ठिकाणी डांबर पॅचवर्क चे काम करण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. मागील वर्षी निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने भांगरवाडी विभागातील रस्त्यांची पावसाळ्यामध्ये अक्षरशः चाळण झाली होती याच धर्तीवर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळा शहरांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे या पावसामुळे शहरात रस्त्यांवर कोणत्या भागात पाणी साचू शकते व कोणत्या ठिकाणी खड्डे पडले आहेत हे दिसून आले आहे प्रशासनाने तात्काळ या सर्व भागांची पाहणी करत पुढील पंधरा दिवसांमध्ये हे सर्व खड्डे भरून घेऊन पॅच वरचे काम पूर्ण करावे अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत. लोणावळा शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर रेल्वे पूल ते मावळे पुतळा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते प्रशासनाने आत्ताच खबरदारी घेत या ठिकाणचे पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. तसेच ट्रायोज मॉल समोरील रस्ता, वलवन नांगरगाव रस्ता, बापदेव रोड, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, बस स्थानक परिसरातील रस्ता या ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. त्या ठिकाणी देखील योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी देखील मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या