Breaking news

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर

मावळ माझा न्युज नेटवर्क : मागील दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने निर्माण झालेली महागाई व रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक या निवडणुकीमध्ये भाजपाला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रात भाजपाने सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले असल्याचा घनाघाती आरोप काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी कामशेत येथील मेळाव्यामध्ये केला आहे. मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी मावळ तालुक्यात विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. या मेळाव्यांची सुरुवात आज कामशेत येथून झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर व मावळ भागातील नागरिक उपस्थित होते.

       महाराष्ट्रामध्ये आज महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक व महिला हैराण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील कारखानदारी बाहेर जात असल्याने येथील तरुण बेरोजगार होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. निर्यात बंदीमुळे उत्पादीत झालेला माल पडून राहिल्याने शेतकरी देखील हवालदील झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी यांच्यापैकी कोणीच या निवडणुकीत भाजपाला मतदान करणार नाही याची पूर्ण खात्री भाजपा नेतृत्वाला झाल्याने मागील तीन वर्षापासून त्यांनी महाराष्ट्र मध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष फोडला. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला, मनसेचे इंजिन पळविले. जर भाजपाला स्वतःच्या बळावर विश्वास होता तर मग हे फोडाफोडीचे व पळवा पळवी चे राजकारण त्यांनी का केले? यावरूनच त्यांचा आत्मविश्वास हा खिळखिळा झाला असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा इंडिया आघाडीलाच मतदान करून या देशाचे संविधान या देशाचे सर्व भौमित्व वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतदार हे विजयाची मशाल पेटवत विकासाची दूरदृष्टी असलेला संजोग वाघेरे यांच्या सारखा नेता दिल्लीमध्ये पाठवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या