Breaking news

Maval Loksabha Election | वाघजाई देवीचा आर्शिवाद घेऊन महाविकास आघाडीकडून खंडाळा, बॅटरी हील भागात मशालीचा जोरदार प्रचार

खंडाळा (प्रतिनिधी) : खंडाळा घाटाची रक्षणकर्ती व खंडाळा गावातील जागृत देवस्थान असलेल्या वाघजाई देवीच्या मंदिरात मशाल पेटवत व देवीचा आर्शिवाद घेत लोणावळा खंडाळा महाविकास आघाडीच्या वतीने खंडाळा प्रभागात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा सोमवारी सायंकाळी जोरदार प्रचार करण्यात आला.

     शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आप, शेकाप या महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे अधिकृत उमेदवार असून मशाल हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेना पक्ष फोडणाऱ्या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन महाविकास आघाडीकडून मतदारांना करण्यात आले. 

        लोणावळा खंडाळा भागातील संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या दहाव्या दिवशी खंडाळा येथील वाघजाई देवीच्या मंदिरात मशाल पेटवून, देवीचे दर्शन घेऊन पत्रकाचे पुजन करून देवीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली. बँटरी हिल, हिल टॉप, केळपेठ खंडाळा, बाजार पेठ, शिवाजी पेठ, रोहिदास वाडा, नेताजीवाडी, गावठाण खंडाळा भागात घरोघरी मतदारांची भेट घेऊन संजोग वाघेरे यांच्या निवडणूक पत्रकांचे व परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. लोणावळा शहरातील सर्व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सेवादलच्या महिला पदाधिकारी, युवा संघटनेच्या पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या