Breaking news

दुःखद घटना l मावळात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

लोणावळा : मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात एका सहलीचा शेवट अत्यंत भीषण दुर्घटनेने झाला आहे. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ३ मे) दुपारच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तीन मित्र सुटीचा आनंद घेण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. उन्हाचा तडाखा असल्याने थंडाव्यासाठी हे तिघेही पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही. पोहताना सुरुवातीला एक जण बुडू लागला, त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोन मित्रही पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. काही क्षणातच तिघेही डोळ्यादेखत दिसेनासे झाले. मृत तरुणांची नावे प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव, आयान शेख (तिघेही रा. पुणे) अशी आहेत.

       घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचाव पथकांना पाचारण केले. 'वन्यजीव रक्षक मावळ संस्था' आणि लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र' या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम हाती घेतली. या शोधमोहीमेत निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, पिंटू मानकर, कैसर शेख, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, रवी कोळी, राजू सय्यद, अनिश गराडे आणि पोलीस पाटील धनंजय पोटफोडे यांसह स्थानिक ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

      मावळ परिसरातील धरणे आणि नद्यांच्या पात्रात पर्यटकांचा राबता मोठ्या प्रमाणावर असतो. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे अनेकदा जीवावर बेतत असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. सध्या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एकाच वेळी तीन तरुण मित्रांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या