खाऊचे पैसे वाचवून आदिवासी बांधवांना मदतीचा हात; कार्मेल कॉन्व्हेंटच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम
खोपोली (प्रतिनिधी) : कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोलीच्या स्काऊट अँड गाईड तुकडीने खोपोली शहरातील लौजी गावात आयोजित केलेल्या समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वर्षा सहलीच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. तब्बल १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमात स्वतःच्या खाऊसाठी मिळणारे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी आदिवासी कुटुंबांसाठी गृहपयोगी साहित्य खरेदी करून त्याचे वितरण केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लौजी गावच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित वर्षा सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्त, सांघिक भावना आणि निसर्गप्रेमाचा अनुभव घेतला. त्यानंतर लौजी गावातील आदिवासी बांधवांना आवश्यक गृहपयोगी साहित्य तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातून संकलित केलेले वापरण्यायोग्य कपडे वितरित करण्यात आले. 'सेवा हीच खरी साधना' या भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सॅनियो स्पेशल स्टील कंपनीच्या (मस्को) सहकार्याने उपलब्ध झालेल्या फळ-फुलझाडे तसेच विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. "एक पॅट्रोल - एक वृक्ष" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. या उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी लौजी गावातील इतिहासप्रसिद्ध विहिरीलाही भेट दिली. विहिरीच्या ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी स्थानिक इतिहास, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलव्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेतले.
कार्यक्रमासाठी हेल्प फाउंडेशन, खोपोलीचे संस्थापक गुरुनाथ साठेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समाजाभिमुख विचारांचे कौतुक करत, "समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि संवेदनशीलता हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची ओळख आहे. अशा उपक्रमांमधूनच देशाला जबाबदार आणि सुजाण नागरिक मिळतात," असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी कारमेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, लौजी ग्रामस्थ किशोर पाटील, अरुण पाटील, राम पाटील, जनता विद्यालय, लव्हेजच्या मुख्याध्यापिका संगीता पवार, ग्रामस्थ तसेच आदिवासी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, सिस्टर सिमी, रेश्मा जाधव, जयसिंथा आणि समीर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
"सेवा, शिस्त आणि निसर्गप्रेम" या स्काऊट अँड गाईडच्या मूलमंत्राचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि सेवाभाव अधिक दृढ केला.



















