रोटरी क्लब ऑफ खोपोलीचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; राधेश्याम गोशाळा परिसरात विविध प्रजातीच्या फळझाडांचे वृक्षारोपण
खोपोली (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या वतीने चौक येथील राधेश्याम गोशाळा परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत आंबा, सीताफळ, लिंबू, नारळ, चिकू आणि बेल आदी विविध प्रजातीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
मोरबे धरणाच्या जलाशयालगत व वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात ही झाडे पर्यावरण समृद्ध करण्यासोबत जैवविविधतेच्या संवर्धनालाही चालना देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच गोशाळा परिसराचे सौंदर्य वाढविणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे यासाठीही या वृक्षारोपणाचा मोठा उपयोग होणार आहे.
विशेष म्हणजे, या फळझाडांचा भविष्यात मनुष्य, प्राणी आणि पक्षी या सर्वांनाच लाभ होणार असून पर्यावरणीय साखळी अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. भविष्यात फळझाडांची वाढती गरज लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आल्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा रोटेरियन सुनिता चव्हाण, सचिव रोटेरियन डॉ. नलिनी रामस्वामी, संचालक रोटेरियन मिलिंद बोधणकर, संचालक रोटेरियन सुनील नांदे तसेच प्रकल्प अध्यक्षा रोटेरियन रजनी देशमुख उपस्थित होत्या.
संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी नियोजन व समन्वयासाठी श्री. स्वप्नील देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी राधेश्याम गोशाळेचे विश्वस्त, पदाधिकारी तसेच श्री. मल्कितसिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पोलीस मित्र संघटनेच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. “आज लावलेली ही रोपं उद्याच्या पिढ्यांसाठी हिरवागार वारसा ठरतील,” असा आशावाद उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.






















