Breaking news

पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श उपक्रम: नांगरगाव गुरु परिवारातर्फे वनविभागाला ६ हजार फळझाडांची भेट

लोणावळा : पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत नांगरगाव गुरु परिवाराच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. लोणावळ्यातील रॅडिसन हॉटेलच्या मागील भागात असलेल्या वनविभागाच्या सुमारे ३ एकर क्षेत्रासाठी गुरु परिवारातर्फे तब्बल ६ हजार फळझाडे वनविभागाकडे लागवडीसाठी सुपूर्द करण्यात आली.

       वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गुरु परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक चाफेकर गुरुजी, उषाजी पंडित, नंदकिशोर खंडेलवाल, गुलाबराव पाटील, रमेशजी यांच्यासह परिवारातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने सिद्धार्थजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमने या रोपांचा स्वीकार केला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे योग्य संवर्धन होणे गरजेचे आहे, या विचाराने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

       हा उपक्रम केवळ राखीव वनक्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता, स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गुरु परिवाराने केला. याच कार्यक्रमादरम्यान कुरवंडे गावातील ग्रामस्थांना तसेच 'शिवदुर्ग' रेस्क्यू टीमचे सक्रिय सदस्य ओंकार पडवळ यांना ५१ फळझाडांची रोपे देण्यात आली. पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना अशा प्रकारच्या व्यापक वृक्षारोपण व संवर्धन मोहिमांमुळे लोणावळ्याच्या हरित पट्ट्याला मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

इतर बातम्या