Ekvira Devi l दिवाळी पाडव्यानिमित्त कार्ला गडावर आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुडुंब गर्दी
लोणावळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनापासूनच देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक लोणावळ्या जवळील कार्ला गडावर दाखल होत आहेत.
दिवाळीच्या सणात देवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण गड परिसर गजबजला आहे. 'आई माऊलीचा उदो उदो… आई आयलो…' अशा जयघोषाने आणि देवीच्या नावाच्या गजराने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांच्या या उत्स्फूर्त गर्दीमुळे मंदिर परिसर आणि पायऱ्यांवर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी योग्य ती तयारी करण्यात आली असून, मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात भाविक देवीचे दर्शन घेत आहेत.
















