Breaking news

उत्सव ग्रामदैवताचा l देवले गावात ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा

कार्ला : देवले गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता भव्य अशा कुस्त्याच्या आखाड्याने करण्यात आली. सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमांची सुरुवात हभप बाळशिराम महाराज मिंडे यांच्या कीर्तनाने झाली.

दुसऱ्या दिवशी भैरवनाथ महाराजांचा रुद्राभिषेक करून महादेवाच्या पिंडीला पितळी कवच घालण्यात आला तसेच हभप घनश्याम महाराज पडवळ यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झाली. 

        तिसऱ्या दिवशी मनोरंजनासाठी भारुड सम्राट हभप तानाजी महाराज कुंभार यांचा एक पात्री भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. चौथ्या दिवशी श्री भैरवनाथ देवाची भव्य अशी पालखी मिरवणूक काढून भाविक भक्तांच्या वतीने दंडवत घालण्यात आला. पाचव्या दिवशी मनोरंजनासाठी फुल टू धमाल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. तर सहाव्या दिवशी भव्य असा लाल मातीतील कुस्त्यांचा आखाडा ठेवून या उत्सवाची सांगता झाली.

 या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी पैलवानांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी देवले यांच्या वतीने करण्यात आले होते.

इतर बातम्या