Breaking news

मोदी सरकारच्या योजना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा - चित्रा वाघ

लोणावळा : मागील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत राबवलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी लोणावळा व परिसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ रविवारी लोणावळ्यात आल्या होत्या. गावठाण व बाजार भागामध्ये प्रचार पत्रकांचे वाटप केल्यानंतर भांगरवाडी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महायुतीचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, मनसे, एसआरपी या घटक पक्षांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

     यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या मागील दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने भरीव अशी कामगिरी केली आहे. सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आहे. बोलणाऱ्याची माती विकली जाते, त्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या योजना व कार्यांची माहिती आपण लोकांना दिली पाहिजे. त्यांना योजना समजावून सांगितल्या पाहिजे, याकरिता प्रथम कार्यकर्त्यांनी योजना समजावून घेतल्या पाहिजेत असा सल्ला देखील त्यांनी दिला. मोदी सरकारच्या योजनांचा अनेकांनी लाभ घेतला आहे. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत त्यांचे मतात रुपांतर करून घेण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे. मावळ लोकसभेच्या मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक आहेत याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत असे चित्रा वाघ यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून मिळालेला निधी याबाबतची माहिती दिली तसेच भाजपाचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, सुरेखाताई जाधव आदरणीय मार्गदर्शन केले.

इतर बातम्या