Breaking news

मावळ तालुक्याचा पर्यटनात्मक विकास झाल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील

मावळ माझा : मावळ तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती येथील निसर्गरम्य परिसर या सर्व परिस्थितीचा विचार करता तालुक्याचा पर्यटनात्मक विकास झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व तालुका खर्‍या अर्थाने समृद्ध होईल.

    निसर्गाचा वरदहस्त लाभलेला मावळ तालुका मुंबई व पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांच्या मध्यावर आहे. तालुक्यात दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असल्याने अनेक धनिकांनी याठिकाणी जागा जमिनी घेत, अलिशान बंगले बांधले आहेत. येथील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने मावळ तालुक्याला सोनेरे दिवस आले आहेत असे म्हंटले जात असले तरी ते एक प्रकारचे मृगजळ आहे. 

    दहा पेक्षा जास्त लहान मोठी धरणं असलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा व खंडाळा ही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना, राजमाची असे किल्ले तर कार्ला, भाजे, बेडसे या जगविख्यात लेण्या आहेत. डोंगर दर्‍या, त्यामधून फेसाळत वाहणारे धबधबे, शेखरू सारख्या अनेक प्राण्यांच्या प्रजाती, जंगली प्राणी यांचे वास्तव्य व पर्यटकांचे मनमोहन टाकणारा हिरवागार निसर्ग अशा सौंदर्यांने नटलेला हा तालुका असल्याने तो जगभरातील पर्यटकांना साद घालतो आहे. मात्र तालुक्याला पर्यटनाचा दर्जा नसल्याने येथे नियोजनबद्ध विकास होताना दिसत नाही. शहरी भागात नगरपरिषदांच्या माध्यमातून विकास होत असताना ग्रामीण भागातील विकास दिशाहीन झाला आहे. पीएमआरडीए च्या अधिकार्‍यांचे तालुक्यात दुलर्क्ष झाल्याने येथे बिनधास्तपणे अनाधिकृत बांधकामे उभी राहू लागली आहेत. ग्रामपंचायतींकडे बांधकाम परवाने देण्याचे अधिकार नसल्याने ते सदर बांधकामांकडे केवळ कर लावण्यापुरते लक्ष देत आहेत. महसुल विभागाचे देखील तालुक्यात लक्ष नसल्याने डोंगरांचे दिवसरात्र लचकेतोड सुरू आहे. टेकड्यांवर सर्रास बांधकामे उभी राहू लागली आहेत. 

    हे सर्व प्रकार असेच सुरू राहिल्यास तालुक्याच्या नावलौकिकाला बाधा पोहचू शकते. शहरी भागातील नागरिकांचा कल सध्या ग्रामीण संस्कृतीकडे वळू लागल्याने शहरी पर्यटक विकेंड सुट्टया घालविण्यासाठी ग्रामीण भागात तसेच धरण परिसरात जाण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जागोजागी पर्यटन केंद्र उभारली जात असली तरी तालुक्यातील लोणावळा खंडाळा असो व पवन, आंदर व नाणे मावळ या भागात येणार्‍या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना तालुक्याचा पर्यटनात्मक विकास होणे गरजेचे आहे. मावळचे आमदार तसेच राज्याचे पर्यटनमंत्री हे याकरिता सकारात्मक असल्याचे कार्ला एकविरा देवी विकास आराखड्यावरून दिसून येत असले तरी संपुर्ण तालुक्याचा एक पर्यटन विकास आराखडा तयार झाल्यास सुनियोजित विकासाला गती मिळेल व तालुक्याला खर्‍या अर्थाने सोनेरी दिवस येतील.

इतर बातम्या