Breaking news

आमदार सुनील शेळके यांचे आरोप बिनबुडाचे - बाबुराव वायकर

तळेगाव दाभाडे : कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले. तुम्हाला आमदार केले. याची जाण तुम्ही धरली नाही. ज्या बापूसाहेब भेगडेंनी तुम्हाला आमदार केले, त्यांच्याबद्दल देखील तुम्ही अरेरावीच्या भाषेत बोलताय. आमच्या बुद्धीला तुमचे कामकाज पटले नाही. आम्हाला तुमच्या कामाची पद्धत पटली नाही. तालुक्यातील सर्व पुढारी तुमच्या विरोधात का गेले? हे तुम्हीच शोधा. आम्ही कुठले ठेकेदार नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद मिळवून देण्यासाठी माजी राज्यमंत्री मदन बाफना साहेब, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे यांनी अजितदादा पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. माझ्या कामाची पावती म्हणून अजित दादांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सभापतीपद मिळाले. यामध्ये आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

            यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, माजी नगरसेवक दिनेश ढोरे उपस्थित होते. आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि.3) वडगाव मावळ येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबुराव वायकर बोलत होते. प्रत्युत्तर देताना वायकर म्हणाले, बापूसाहेब भेगडे यांना सर्व पक्षांनी दिलेला पाठिंबा आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी पाहून आमदार शेळके हे माझ्यासह सुभाष जाधव व रुपेश म्हाळसकर यांच्यावर खोटारडे व बिनविरोधाचे आरोप करत आहेत. या आरोपांचा आम्ही सर्वप्रथम निषेध करीत आहोत. बाबुराव वायकर यांच्या घरासमोर 90 लक्ष रुपयांचा फंड टाकला या आमदार शेळके यांच्या आरोपांचे यावेळी जोरदार खंडण करण्यात आले.

     सुभाष जाधव म्हणाले, देवस्थान संस्थानवरती असलेले विश्वस्त आणि त्यांना मिळालेली पदे ही अंतर्गत बाब आहे. याच्याशी आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक म्हणून मी कामकाज करीत आहे. माझ्यातील असलेली गुणवत्ता पाहून हे पद मला मिळाले आहे. आमदार शेळके यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. रुपेश म्हाळसकर म्हणाले, मनसेला वैचारिक बैठक आणि दिशा आहे. राजसाहेब यांचा आदर्श ठेवून काम करतो आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनसेच्या माध्यमातून मी स्वतः आणि सायली म्हाळसकर यांनी समाजाभिमुख अनेक उपक्रम राबविले. समाजकारण करताना राजकारण कधीच केले नाही. कामाची पावती म्हणून सायली रुपेश म्हाळसकर यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली.यामध्ये आमदार सुनील शेळके यांचा काहीही संबंध नाही. रुपेश म्हाळसकर यांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला.

इतर बातम्या