Breaking news

Khandala Rajmachi Point : खंडाळा राजमाची पाॅईट येथील निसर्गाचा अविष्कार व सेल्फीचा मोह

लोणावळा : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या खंडाळा शहरातील राजमाची पाॅईटवर सेल्फी काढण्याचा मोह भल्या भल्यांना आवरता येत नाही. सर्वदूर पसरलेल्या डोंगर दर्‍या त्यामधून फेसाळत वाहणारा धबधबा, डोंगरांमधून वाहणारे धुके, मध्येच सुर्याची किरणे व इंद्रधनुची चाहूल अश्या मनाला थक्क करणार्‍या मनमोहक वातावरणात कोणालाही सेल्फी काढण्याचा मोह होणार यामध्ये यत्किंचितही शंका नाही. खंडाळ्याचा हा निसर्ग प्रत्येकजण मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी क्षणभर थांबत असतो. याठिकाणासह येथील सनसेट पाॅईट, खंडाळा तलाव, ड्युक्स नोज, अमृतांजन पुलासमोर लहानशी टेकडी हा सर्व परिसर सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. मुंबईच्या गरम व दमट वातावरणातून जसेजसे आपण घाट चढत वर येतो तसतसा हा निसर्गाचा अविष्कार पहायला व अनुभवायला मिळत. सुखद असा गारवा येथे असल्याने पर्यटक सध्या याभागात मोठी गर्दी करत आहेत. पावसाच्या सरींमध्ये गरमागरम चहा सोबत मक्याचे उकडलेले दाणे व भाजलेले कणीस खाण्यांचा आनंद येते आल्याशिवाय अनुभवायला मिळणार नाही. मात्र हे सर्व करत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे जीवाची काळजी घ्या. फाजिल आत्मविश्वास येथे कामाचा नाही. सेल्फीच्या मोहापायी दरीच्या अगदी तोंडावर जाऊ नका तसेच पावसामुळे परिसर निसरडा होतो त्यामुळे डोंगर टेकड्यांवर जाताना काळजी घ्या असे आवाहन जीवरक्षक टिमकडून करण्यात येत आहे. निसर्गाचा अविष्कार असलेल्या खंडाळा व लोणावळा शहरात आल्यानंतर येथील निसर्गाशी एकरुप व्हा, निसर्गाचा आनंद घ्या, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा. धरणे व धबधबे असलेल्या भागात आताताहीपणा करू नका. वाहने चालविताना नियमांचे पालन करा, मद्य प्राशन करून वाहने चालवू नका, सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा करू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या