Maval Crime News l पवनानगर येथे दगडाने ठेचून युवकाचा खून
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवनानगर भागातील प्रभाचीवाडी येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (1 नोव्हेंबर) रोजी सकाळी सात च्या सुमारास उघडकीस आली.
नीलेश दत्तात्रय कडू (वय 30, रा. सावंतवाडी महागाव ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून करण्याच्या मागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. प्रभाचीवाडी महागाव हद्दीत अज्ञात व्यक्तींनी नीलेश कडू यांचा दगडाने ठेचून खून केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊ मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खुनातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे पुढील तपास करीत आहेत.