Breaking news

Vision Green India : दृष्टिहीन व्यक्तींचे "व्हिजन ग्रीन इंडिया"; आमच्याकडे दृष्टी नाही पण दूरदृष्टी आहे!

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : आमच्याकडे दृष्टी नाही पण दूरदृष्टी आहे असे म्हणत, डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या व्यक्तींनी आता हरित भारताचं स्वप्नं पाहिलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आस्था हँडीक्राफ्ट्स यांनी दृष्टिहीन व्यक्तींच्या व्यथा, वेदना व गरजा भागविण्यासाठी व्हिजन ग्रीन इंडिया हा प्रकल्प अगदी छोट्या जागेत सुरू केला आहे. या ठिकाणी दृष्टिहीन बांधव देशी झाडांच्या बिया मातीत टाकून सिड बॉल (बीज गोळे) बनविण्यात व्यस्त आहेत. याला भविष्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. कोरोनाच्या संकटावर मात केल्यावर यांनी सहा महिन्यात अडीच लाखाहून अधिक सिड बॉल बनविले आहेत.आपण सुजाण नागरिकांनी या उपक्रमाला नक्कीच पाठबळ द्यायला हवे. त्यांनी हरित भारत करण्याचा वसा घेतला ही कौतुकाची व अभिमानाची बाब आहे. आपण डोळस व्यक्तींनी आता हे सिड बॉल मातीत रुजवून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा. आपल्या घरात, परिसरात व मोकळ्या जागेत हे सिड बॉल रुजविणे गरजेचे आहे. अगदी भेटवस्तु म्हणून सुद्धा हे द्यायला हवेत. या हरित क्रांती साठी सेवा भावी संस्था व कार्यकर्ते यांनी त्यांना सहकार्य करणे ही एक देशसेवा आहे.

नेत्रदान जनजागृती व दृष्टिहीन व्यक्तींच्या रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व व त्यांचा मित्र परिवार हा प्रकल्प राबवित आहेत. चिंचवड मधील इंदिरा नगर (भोईरनगर) चौका लगत हा प्रकल्प सुरू आहे. अनेकांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. आपणही या उपक्रमास नक्की भेट द्यावी व हरित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा हे दृष्टिहीन बांधव करत आहेत.

संपर्कासाठी :- आस्था हँडीक्राफ्ट्स इंदिरानगर,चिंचवड,पुणे 411033 (9822336318  / 9822336356)

इतर बातम्या