सिंहगड व डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये विजयादशमीचा उत्सव
लोणावळा : पुणे-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या पासधारक प्रवाशांकडून सिंहगड व डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये खंडेनवमी तसेच विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपण ज्या गाडीने दररोज प्रवास करतो त्या गाडीबद्दल, आपल्या जीवन वाहिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने पुणे मुंबई पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांच्या वतीने दरवर्षी खंडे नवमी व विजयादशमीच्या निमित्ताने दुर्गा माता पूजन आयोजित केले जाते. याही वर्षी सिंहगड व डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये दुर्गा माता पूजन, आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे स्टेशन येथे जाऊन रेल्वे इंजिनची पूजा करण्यात आली, तसेच मोटरमन, गार्ड यांना मिठाई वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमाकरिता पुणे मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणारे सर्व जुने-नवे सहकारी, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, सर्वांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करून आनंद साजरा केला, प्रसादाचा लाभ घेतला आणि एकमेकांना विजयादशमीच्या व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.