Maval News l वडेश्वर शाळेतील शिक्षिका वनिता राजपूत यांची पोस्ट ऑफ द मंथ सन्मानासाठी निवड
मावळ माझा न्युज नेटवर्क : वडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका वनिता राजपूत यांचा पंचायत समिती मावळच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या इयत्ता सहावीच्या पत्रलेखन या उपक्रमाची दखल घेत विनोबा ॲप च्या 'पोस्ट ऑफ द मंथ' या सन्मानासाठी त्यांची निवड झाली आहे. पंचायत समिती वडगाव मावळ येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, वडेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे, विनोबा ॲपचे रोहित गारोले इ. मान्यवर उपस्थित होते.
वनिता राजपूत या वडेश्वर येथील उपक्रमशील शिक्षिका असून विविध प्रशिक्षणांमध्ये त्या सुलभक म्हणून उत्तम भूमिका बजावत असतात. वडेश्वर केंद्रातील 'टॅग' या उपक्रमाच्या त्या समन्वयक असून विद्यार्थी इंग्रजी भाषेत निपुण व्हावेत यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. यापूर्वी त्यांना पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला असून विनोबा ॲपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल आंदर मावळातून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.