दुःखद घटना l पवना धरणात दोन तरुण बुडाले; एकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेसक्यू पथकाला यश
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात दुधिवरे खिंड परिसरात दोन तरुण बुडाले आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेसक्यू पथकाला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये काम करणारे आठ ते दहा तरुण पवना धरण परिसरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिरायला आले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ते पाण्याच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र यश न आल्याने सायंकाळी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेसक्यू पथकाला पाचारण करण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली. लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक व शिवदुर्ग रेसक्यू पथक यांनी घटनास्थळी पोहचत शोध मोहीम सुरू केली. पाण्यात बुडललेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे.