Breaking news

महिला अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचा धाक असावा; सोबतच जनजागृतीही महत्त्वाची - बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड : देशात महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. तरी देखील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. यामुळे कठोर कायदे करत असताना त्या कायद्याचा धाक व माहिती असणे आवश्यक आहे. समाजात जनजागृती करणे देखील महत्त्वाचे आहे. महिलांना नुसते राजकीय आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही. कामगार कष्टकरी बांधकाम मजूर, धुणीभांडी स्वयंपाक करणाऱ्या,  साफसफाई, फळे भाजी विक्रेत्या महिला या सर्व कष्टकरी घटकातील महिलांना सन्मानाची वागणूक देखील मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.

   राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या सर्व घटनांचा पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा संघटनांनी निषेध केला. पुणे येथील वाडिया कॉलेज समोरील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, कष्टकरी कामगार पंचायत कष्टकरी जनता आघाडी, टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनांच्या वतीने आयोजित सभेत बाबा कांबळे बोलत होते.

       पुणे येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा निषेध करण्यात आला. अशी घटना पुण्यात परत घडू नये अशा प्रकारची सदभावना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मेणबत्ती पेटवून व्यक्त करण्यात आली. तसेच मुंबई साकीनाका येथील पीडित महिलेस कॅण्डल पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

   यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, माता रमाई भिमराव आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कष्टकरी जनता आघाडी महिला अध्यक्ष अनिता सावळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अर्शद अन्सारी, टपरी पथारी हातगाडी पंचायत पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ पोटे, कष्टकरी जनता आघाडी पुणे शहराध्यक्ष अलीभाई शेख, उपाध्यक्ष शमीम शेख, आयशा अन्सारी आदी उपस्थित होते.

इतर बातम्या