Breaking news

Lonavala News l भांगरवाडी तालमीचा ओटा येथे बंद घराचे कुलूप तोडत चोरी; सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज लंपास

लोणावळा : भांगरवाडी तालमीचा ओटा येथे 15 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 11.45 दरम्यान चोरीची घटना घडली आहे. बंद घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने कपाटातील तब्बल सव्वापाच लाख रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी योगिता तेलंग यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची माहिती दिली आहे.

     तेलंग ह्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता घरातून कामासाठी बाहेर गेल्या, त्यांचे पती देखील 10.30 वाजण्याच्या सुमारास घरातून कामासाठी बाहेर गेले, त्यानंतर त्यांना 11.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रीचा फोन आला की घराचा दरवाजा उघडा आहे व आवाज मारते पण घरात कोणीच नाही. असे सांगितल्यावर तेलंग यांनी तात्काळ घरी येऊन पाहिले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने लंपास केले होते. व सर्व साहित्य विस्कळीत करून टाकले होते. कपाटातील सोन्याचा राणीहार, बांगड्या व इतर दागिने असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याविषयी बोलताना लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी म्हणाले, लोणावळा शहरात मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रकार देखील घडले आहेत. मागील आठवड्यात गावठाण भागातील एका घरातून लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार झाला होता. आता भांगरवाडी भागात सकाळी सकाळी चोरीची घटना घडली आहे. पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत घटनांचा उलगडा करत चोरट्यांना जेरबंद करावे तसेच पोलीस गस्त शहरात वाढवावी. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या