Breaking news

Traffic News : मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सकाळपासून कासवगती झाला आहे

लोणावळा :  वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज सकाळपासून कासवगती झाला आहे. त्याचे कारण सुट्ट्यांमुळे या मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या व घाट क्षेत्रांमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे जागोजागी बंद झालेले हे आहे.

     सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे पर्यटनस्थळांवर विशेषता लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान या थंड हवेचे ठिकाणांसह कोकण व विविध भागांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक पर्यटन स्थळांवर फिरायला जात असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आज सकाळपासून पहायला मिळाले. द्रुतगती महामार्गावर कोंडी झाल्यामुळे अनेक वाहनचालकांनी जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास सुरू केल्याने खोपोली लोणावळा खंडाळा या शहरांमध्ये देखील वाहतूक कोंडी झाली होती. शुक्रवार, शनिवार, रविवार याला जोडूनच सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी आल्यामुळे या लॉंग वीकेंड आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक खासगी वाहनांमधून विविध पर्यटन स्थळांवर जाऊ लागली आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्ग पोलीस तसेच लोणावळा खोपोली खालापूर येथील पोलीस सदर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र वाहनांच्या संख्ये पुढे रस्ते काहीसे कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत होते. वाहतूक कोंडीचे दुसरे कारण म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे सुरू असलेले काम. या कामामुळे घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे तर ब्लास्टिंग साठी काहीवेळा वाहतूक थांबवली जाते यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या होऊन बसली आहे. येणारे पुढील तीन दिवस सुट्टीचे असल्यामुळे वाहतूक कोंडी ही होणारच असल्याची शक्यता ध्यानात घेत पर्यटक व वाहन चालकांनी घराबाहेर पडण्याचे नियोजन करावे तसेच आपल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार नाही याचे भान देखील वाहनचालकांनी राखणे गरजेचे आहे.

इतर बातम्या