Breaking news

Expressway Breaking News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना मारहाण करुन दरोडा टाकणारी टोळी 24 तासात गजाआड

कामशेत : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ताजे गावच्या हद्दीत ट्रक चालकांना मारहाण करून दरोडा टाकणारी टोळी 24 तासात जेरबंद करण्यात आली आहे. कामशेत पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून आरोपींकडून 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे एकूण 14 मोबाईल फोन आणि 690 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. सदर घटना ही मंगळवार (दि. 27 डिसेंबर 2022) रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.

      याप्रकरणी अनिल तुकाराम वाघमारे (वय 20), नवनाथ संतोष वाघमारे (वय 20), अनिल बारकु वाघमारे (वय 22), नवनाथ तुकाराम वाघमारे (वय 20, सर्व रा. मुंढावरे ता. मावळ, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांचे साथीदार मुस्ताफा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), दत्ता पवार (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), मंग्या (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, सर्व रा. भाजगाव, ता. कर्जत, जि. रायगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ताजे गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंप परिसरात मंगळवार (दि. 27 डिसेंबर 2022) रोजी रात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणारे दोन ट्रक चालक आपल्या ट्रकमधील हवा चेक करत असताना वर नमूद सहा ते सात आरोपींनी दोन्ही ट्रक चालकांना व त्यापैकी एका ट्रकमधील एका प्रवाशी महीलेस आणि तिच्या पतीस गंभीर मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन दरोडा टाकला होता. 

     दरम्यान, सदर ठिकाणी वारंवार अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असल्याने तसेच सदर ठिकाणी संशयीतांना गुन्हा करुन लपण्याजोगी मोठी झाडीझुडपे असल्याने आणि संशयीतांबाबत काही एक उपयुक्त माहीती नसल्याने त्यांना पकडण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. त्यानुसार गुन्हा दाखल होताच लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासोबत पोलीस पथकाची विभागणी करुन घटनास्थळी व परिसरात या गुन्हयातील संशयीत आरोपीतांना शोध घेण्यासाठी गस्त सुरु केली. त्यानंतर या परिसरात संशयास्पद आढळून आलेल्या इसमांचा साधारण 5 ते 6 किमी झाडीझुडपात, अंधारात धावत पाठलाग करत, सापळा रचून मोठ्या शिताफिने कामशेत पोलिसांनी वर नमूद आरोपींना गुन्हा घडल्यापासून 24 तासात ताब्यात घेवून त्यांचा कसून तपास केला असता त्यांनी त्याचे साथीदार यांच्या नावाची कबुली देत गुन्हा केल्याची कबुली दिली. 

      सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार समीर शेख, जीतेंद्र दिक्षीत, रविंद्र राय, पोलीस नाईक प्रविण विरणक, सचिन निंबाळकर,  हनुमंत वाळुंज, नितीन कळसाईत, बाळासाहेब गावडे, पोलीस काॅन्स्टेबल आशिष झगडे, शरद खाडे, रविंद्र राऊळ, अमोल ननवरे यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या