Breaking news

कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिराचे दरवाजे घटस्थापनेला उघडणार; नवरात्रीचा कार्यक्रम जाहिर

लोणावळा : येथील जगप्रसिद्ध लेण्यांच्या कुशीत वसलेल्या श्री एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आश्विन शु. प्रतिपदेला म्हणजेच 7 ऑक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा होम 13 ऑक्टोबरला पहाटे होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे मुख्य पुजारी संजय गोविलकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

   नुकतेच राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे व मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव कार्यक्रमांची माहिती गोविलकर यांनी दिली. यानुसार घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सात ते आठ या वेळेत आई एकवीरा व आई जोगेश्वरी देवीची षोडशोपचार पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. आश्विन शु. अष्टमीला दुर्गाष्टमीचे उपवास असून सर्वात महत्वाचा होम हवन हा विधी बुधवारी रात्री अकरा वाजता सुरू होणार असून पूर्णाहुती पहाटे पाच वाजता करून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान या नऊ दिवसांच्या काळात गडावर रोज पहाटे दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येणार आहे.

   गतवर्षी कोरोनामुळे देवीचा हा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला होता. परंतु या वर्षी सालाबादप्रमाणे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य प्रशासक व मुंबई उच्च न्यायालयाचे अधीक्षक केतन त्रिवेदी यांनी दिली आहे.

 चोख बंदोबस्त तैनात करणार - लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील 

यात्रा काळात भाविकांची वाढती संख्या पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तसेच सुलभ दर्शन घेता यावे यासाठी गडावर तसेच पायथ्याला चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून याचे नियोजन ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्याकडे असणार आहे, अशी माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली.

इतर बातम्या