Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरे यांनी घेतले कार्ला गडावर आई एकविरा देवीचे दर्शन

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस उद्धव ठाकरे यांनी आज कार्ला गडावर येऊन कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. कोल्हापूर दौरा उरकल्यानंतर तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची मनोकामना व्यक्त केली. यावेळी त्यांच्या सोबत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, शिवसेना पुणे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, पनवेल तालुका संघटक रामदास पाटील, पनवेल ग्राहक कक्षाचे तालुका पदाधिकारी राजा किनी हे उपस्थित होते. श्री एकविरा देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी तेजस ठाकरे यांचा गडावर सन्मान केला. श्री एकविरा देवी ही ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी आहे. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा विघ्न आली तेव्हा ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकविरेच्या पायावर माथा टेकवत यश मिळावे असे साकडे घातले व यश मिळाल्यानंतर गडावर येऊन नवस देखील फेडल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेजस हा लहान असला तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत अनेक वेळा गडावर आला आहे. आज राजकारणात नसला तरी तेजस याने शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आर्शिवाद घेतल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.