Breaking news

Talegaon News : अँड. परांजपे विद्यालयात तालुकास्तरीय आंतरशालेय बौद्धिक स्पर्धा संपन्न

तळेगाव दाभाडे : अँड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात नू. म. वि. प्र. मंडळाचे संस्थापक सचिव व राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यू कै. गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मावळ तालुका पातळीवर भव्य स्वरुपात  बौद्धिक स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. स्पर्धेचे हे 33 वे वर्ष आहे. प्रतिवर्षीप्रमाणे तालुक्यातील विविध शाळेमधील विद्यार्थांचा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. 30 शाळांमधून 277 विद्यार्थी सहभागी झाले होते.

     बौद्धिक स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नू.म.वि.प्र. मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, संचालक सोनबा गोपाळे, शालेय समितीचे सदस्य आनंद भेगडे, बाळासाहेब शिंदे, काशिनाथ निंबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक पोटे सर यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक स्पर्धांचे स्वरूप व आजच्या युगात त्यांचे महत्त्व सांगितले. बौद्धिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना परांजपे विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार म्हणाले, विद्यार्थ्यांनी  बदलत्या स्पर्धेच्या जीवनात विविधांगी शिक्षण घ्यावे तसेच हे शिक्षण घेत असताना विविध उपक्रमांमध्ये देखील सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन केले  .

      सोनबा गोपाळे यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या कार्याची आणि शालेय उपक्रमाची ओळख करून दिली. तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पद्य पाठांतर स्पर्धा अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन पहिली ते बारावी पर्यंतच्या गटासाठी केले होते. या स्पर्धेसाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले अनुभवी परीक्षक लाभले.परांजपे विद्यालय हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. बौद्धिक स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख म्हणून दीप्ती बारमुख, शरद जांभळे, संपत गोडे, संतोष घरदाळे, धनंजय नांगरे, आरती पोलावार, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारमुख व आशा आवटे यांनी केले तर आभार शाळेचे पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले.

इतर बातम्या