Breaking news

नांगरगावातील विठ्ठल रुख्मीणी मंदिरात काकडा आरतीला ग्रामस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति | पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती | या प्रमाणे सध्या मावळ तालुक्यात गावोगावी सुरु असलेल्या पहाटेच्या काकडा आरतीने मावळवासीयांच्या दिवसाची मंगलमय सुरुवात होत आहे. नांगरगावातील विठ्ठल रुख्मीणी मंदिरात काकडा आरतीला ग्रामस्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. 1983 सालापासून याठिकाणी काकडा केला जातो आहे. येथील मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. नुकताच मंदिराचा कलशरोहन व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला होता.

    काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते. लोणावळा शहरातील नांगरगाव येथील विठ्ठल रुख्मीणी मंदिर, वाकसई, सदापुर, भाजे, कुसगाव वाडी आदी गावांमध्ये काकडा केला जातो. पहाटे साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास या काकड्याला सुरुवात होते. देवांचे अभ्यंगस्नान व वस्त्रालंकार झाल्यानंतर पाच वाजणच्या दरम्यान काकडारती केली जाते. दरम्यानच्या कालावधी मध्ये विविध भजने, आरती स्त्रोत म्हंटली जातात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. मंदिराच्या परिसरात सुहासिनी आकर्षक रांगोळी काढत परिसर सुशोभित करतात. काकड आरती दरम्यान विजेचे दिवे बंद केले जातात. यावेळी मंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या आरतीच्या ताटांमधील दिव्यांनी मंदिराचा परिसर उजाळून निघतो. अतिशय नयनमनोहर असे हे दृश्य पाहण्यासाठी किमान एकदा तरी काकडा आरतीत सहभागी होणे गरजेचे आहे.

    गावातील लहान थोर सर्वजण ह्या काकड आरतीला आवर्जून हजेरी लावतात. यामुळे गावांमध्ये एक प्रसन्न व आनंदी वातावरण निर्माण होत आहे. आरती झाल्यानंतर सर्वांसाठी नाष्ट्याची व्यवस्था केली जाते. महिनाभराचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार हा क्रमावर नाष्टा ग्रामस्त देत असतात. अशा या मंगलमय उपक्रमांनी सध्या गावोगावी पहाट होत आहे. 


इतर बातम्या