Breaking news

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा पहाटेचा धक्का; भाजपाने जिंकली तिसरी जागा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपाने तिसरी जागा जिंकत शिवसेनेला पुन्हा पहाटेचा धक्का दिला आहे. भाजपाचे तिसर्‍या जागेसाठीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. तर काही मतांवर आक्षेप घेण्यात आल्याने मतमोजणीला उशिर झाला व पहाटेच्या दरम्यान या जागांचे निकाल जाहिर झाले. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने निवडणूक चुरशीची झाली होती. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार यांना 33 मते मिळाली. अपक्ष आमदार व लहान पक्षांचे आमदार यांची मने परिवर्तीत करत त्यांची मते मिळविण्यात भाजपाला यश आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीत तीन पक्ष असताना व निवडणूक जिंकण्याकरता सर्वतोपरी तयारी केली असताना देखील अपयश पदरी आल्याने महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे.

     या विजयाविषयी बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रथम आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांचे आभार मानत विजय त्यांना समर्पित केला. आजारी असताना देखील हे दोन्ही आमदार पक्षासाठी मतदान करण्यासाठी आले. विजयाची ही घौडदौड अशी सुरु राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हा विजय अनपेक्षित नव्हता असे सांगत मते मिळविण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाले असे सांगितले. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाने जागा जिंकली असली तरी ते विजयी झाले असे मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

विजयी उमेदवार व मिळालेली मते

भाजपा - पियुष गोयल - 48, अनिल बोंडे - 48, धनंजय महाडिक - 41. शिवसेना - संजय राऊत - 41. काँग्रेस - इम्रान प्रतापगढी - 44. राष्ट्रवादी काँग्रेस - प्रफुल्ल पटेल - 43

इतर बातम्या