Breaking news

Railway News : सिंहगड एक्सप्रेस व डेक्कन क्विनचे कमी केलेले जनरल डब्बे पुन्हा सुरु करा; पिंपरी चिंचवड प्रवासी संघाची मागणी

पिंपरी चिंचवड : मध्य रेल्वेच्या मुंबई - पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस व डेक्कन क्वीन या गाड्याचे जनरल डब्बे कमी करण्यात आल्याने या गाड्यांमधून दैनंदिन मुंबई पुणे प्रवास करणारे कामगार आणि व्यावसायिक प्रवाश्यांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाकडे करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी संघटना पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना याबाबत निवेदन दिले आहे. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस एलएचबी कोचसह नव्या स्वरुपात सुरू केल्या आहेत. मात्र, या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीनला एकच जनरल डबा असल्यामुळे, या डब्यामध्ये उभे रहाणेही मुश्कील होते. त्यामुळे तिकीटधारकांना आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरक्षित तिकीटधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यातून प्रवाशांमध्ये वाद होतात. सिंहगड एक्सप्रेस मार्च 2020 पर्यंत 19 डब्यांची होती. त्यानंतर 21 मार्च 2022 पर्यंत 16 डब्यांची होती. सध्याची ही गाडी 14 डब्यांची असून दोन जनरल डबे कमी केले आहेत. डेक्कन क्वीन एक्सप्रेसची एक जनरल बोगी कमी केली आहे. या दोन्ही गाड्या प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांना जनरल डबे (बोगी) कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीट धारकांचा प्रवास अतिशय त्रासदायक होत आहे. ते टाळण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला एक जनरल डबा आणि सिंहगड एक्सप्रेसला दोन जनरल डबे जोडावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

इतर बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ. यांच्याकरिता सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई