Breaking news

Rasta Roko Andolan : सकल मराठा समाजाच्या वतीने कार्ला फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

लोणावळा : मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये 10 टक्के आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशनात केला असला तरी सकल मराठा समाजाची मूळ मागणी असलेल्या सगे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा मंजूर करत मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी आज लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता हे आंदोलन करत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता. सकल मराठा समाज मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाला होता.

    मराठा समाजाला ओबीसी मधून हक्काचे आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मूळ मागणी आहे. मात्र मराठा समाजाच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र शासनाने मराठा समजला 10 टक्के आरक्षण देऊ केले आहे. हे आरक्षण न्यायालयीन पातळीवर टिकण्याची शक्यता कमी असून शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. शासनाने कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे व त्यांचे सगे सोयरे यांना देखील या आरक्षणचा लाभ द्यावा, या मागणीचा जो पर्यंत कायदा होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यभरात जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. 

     कार्ला फाटा येथे अर्धा तास हे रास्ता रोको आंदोलन झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. पुणे जिल्ह्यात मध्यरात्री पासून कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले असल्याने याठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेच्या मार्गाने सदरचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इतर बातम्या