Breaking news

मावळ तालुक्यात पावसाचा हाहाकार; मळवली, बोरज, देवले, वाकसई चाळ, कार्ला परिसरात इंद्रायणीला पूर - नाणे पुल गेला पाण्याखाली

कार्ला (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुधवारी दिवसरात्र झालेला मुसळधार पाऊस व शनिवार पासून सुरू असलेली संततधार यामुळे मावळात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीपात्रातील पाणी वाकसई चाळ, कार्ला, मळवली, देवले, बोरज परिसरात पसरले आहे. बोरज येथील घरकूल व परिसराला पाण्याचा विळखा बसला असून देवले मळवली रस्ता पाण्याखाली गेला आहे. कामशेत जवळील नाणे पुल पाण्याखाली गेला असून सुमारे अर्धा किमी परिसरात पाणी पसरल्याने मार्ग बंद झाला आहे. कुसगाव येथील नाल्याचे पाणी परिसरातील घरांमध्ये घुसले आहे. भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटीला पाण्याचा विळखा पडला आहे. डेनकर काॅलनी येथील काही घरांमध्ये पाणी साचले आहे. भांगरवाडी येथील दामोदर काॅलनी रात्रभर पाण्याखाली होती. भांगरवाडी महावितरण कार्यालय, अँड. नागेश निवास, पांढरे घर, रचना गार्डन समोरील रस्ता हा सर्व भाग पाण्याखाली गेला होता. माऊली मंगल कार्यालया शेजारी राजु फाटक यांच्या घरात सुमारे चार फुट पाणी झाले होते. जागोजागी बांधकामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आले आहे. तसेच बांधकामांच्या सुरक्षा भिंतीमुळे पावसाचे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने नदी नाल्यांचे पाणी जागा मिळेल त्या भागात पसरले आहे.

    रात्री पडलेल्या पावसामुळे टाटा धरणाची पातळी 4.79 मीटर झाली आहे. पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास पुढील काही तासात धरणाचे पाणी सांड्यावरून इंद्रायणी नदीपात्रात येण्याची शक्यता असल्याने पात्रालगतच्या घरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. टाटा धरणप्रमुख बसवराज मुन्नोरी यांनी तसा संदेश पाठविला आहे.

    लोणावळा नगरपरिषद व शिवदुर्ग पथक आपत्कालीन मदतीसाठी सज्ज असून कोणत्या भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले असल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या