Breaking news

लोणावळा शहर व ग्रामीण भागात विकेंडला 470 जणांवर दंडात्मक कारवाई

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामीण भागात जमावबंदी व पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍या 470 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस, लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद यांनी शनिवार व रविवार या दोन दिवसात कारवाई करत दंड वसुल केला.

    लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर होणारी पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी मावळ भागातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार विकेंड लाॅकडाऊन घोषित केला. असे असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करत शनिवार व रविवारी पर्यटक लोणावळा शहर व ग्रामीण भागात दाखल झाले होते. पोलीस प्रशासनाकडून पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बंद करत या पर्यटकांना माघारी पाठविले तर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल 310 जणांना दंड आकारला. लोणावळा शहर पोलिसांनी 100 जणांवर तर लोणावळा नगरपरिषदेने 60 जणांवर दंडात्मक कारवाई केली.

    प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन देखील पर्यटक ऐकत नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. सोबतच अनेक व्यावसायिक देखील नियमांचा भंग करत आहेत. कारवाई केल्यानंतरही काही व्यावसायिक पुन्हा नियम मोडतात. तर काही जण शटर अर्ध ठेवणे, शटर बंद करून दुकानाबाहेर माणूस उभा करणे असले प्रकार करत आहेत.

   प्रशासकीय आदेश व पर्यटनस्थळ बंदी यामुळे पर्यटनस्थळ भागात व्यावसाय करणारे लहान व्यावसायिक मात्र मेटाकुटीला आले आहेत. स्थानिक रिक्षा व टुरिस्ट चालकांना पर्यटनस्थळ बंदीमुळे साईडसीन करता येत नसल्याने त्यांना एकाच जाग्यावर बसून रहावे लागत आहे. गाड्यांचे हप्ते, लहान व्यावसायिकांना दुक‍ानांची भाडी, घरातील अडचणी, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याने आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न हे व्यावसायिक उपस्थित करू लागले आहेत. प्रशासनाने त्यांच्याबाबत सकारात्मक भुमिका घेणे गरजेचे आहे.

इतर बातम्या