Breaking news

पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात; उद्या होणार मतदान

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 10 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत तीस जागांसाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीची मतमोजणी 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

    पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. याकरिता समितीचे सदस्यपद मिळावे यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र (मोठे नागरिक), नगरपालिका क्षेत्र (लहान नागरिक) आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती क्षेत्र (ग्रामीण मतदारसंघ) अशा तिन्ही मतदारसंघात चौदा मतदान केंद्र निश्चित केली आहेत. त्यासाठी तीस जागांसाठी 978 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी चौदा मतदान केंद्रे असणार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील मतदारांसाठी दोन्ही महापालिकांच्या मुख्य इमारतीमध्ये मतदानाची व्यवस्था असणार आहे.

   जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांसाठी मावळ पंचायत समिती, शिरुर पंचायत समिती, पुरंदर पंचायत समिती, खेड पंचायत समिती, दौंड नविन प्रशासकीय इमारत, भोर तहसील कार्यालय, हवेली पंचायत समिती, मुळशी पंचायत समिती, वेल्हे तहसील कार्यालय या ठिकाणी मतदान केंद्र असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    या नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या तीस जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या मोठ्या नागरी मतदारसंघांत बावीस जागा आहेत. त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तेवीस नगरसेवकांपैकी चौदा असलेल्या नगरसेवक पुणे महापालिकेतील आहेत. या मतदारसंघासाठी मतदारांची संख्या 285 आहे. त्यात 137 नगरसेवक आणि 148 नगरसेविकांचा समावेश आहे. लहान नागरी मतदारसंघात एका जागेसाठी तीन उमेदवार आहेत. त्यासाठी लोणावळा, तळेगाव, शिरूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर आणि सासवड नगरपरिषदांतील 114 सदस्य मतदान करणार आहेत. त्यामध्ये 64 माहिला सदस्य आणि 50 पुरुष सदस्य आहेत. ग्रामीण सात जागांसाठी मतदारसंघामध्ये 21 उमेदवार आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सरपंच हे मतदार आहेत. त्यांची संख्या 579 आहे. त्यामध्ये 270 पुरुष मतदार, तर 309 महिला मतदार आहेत.

इतर बातम्या