Breaking news

एचए ला कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी पिंपरी चिंचवड मनपा देणार पंचवीस कोटी रुपये - ॲड. नितीन लांडगे


हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक पाठबळ


पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेमध्ये गुरूवारी सर्वक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे लस निर्मितीच्या बाबतीत पिंपरी-चिंचवडकरांची आता आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

        पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्पप्रमणात लसीचा पुरवठा होत आहे. परिणामी, शहरातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आवश्यक निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेने द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर महापालिका स्थायी समिती आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी- पदाधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला आहे. याबाबत सभापती ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, ‘एचए’ कंपनीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली, तर तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि महापालिका प्रशासनात आवश्यक असलेले करार आर्थिक तरतूद करण्याबाबत कार्यवाही करावी, असे पत्र भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिले होते. तसेच, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ निर्णय घेतला आहे.

      याबाबतची कंपनी व्यवस्थापनासोबत पहिली प्राथमिक बैठक 17 मे रोजी झाली. 18 मे ला कंपनीने प्रस्ताव दिला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. अवघ्या आठवडाभरात हा विषय मार्गी लावला आहे. 'एचए' कंपनीबाबत करार करणे आणि महापालिकेस लस पुरवठा करून घेण्याबाबत सर्वाधिकार महापालिक आयुक्त राजेश पाटील यांना बहाल केले आहेत. कंपनीच्या वतीने उत्पादन होणारे पहिल्या टप्प्यातील सर्व उत्पादन पिंपरी चिंचवड मनपास योग्य किंमतीत द्यावे, अशीही मागणी आपण करणार आहोत. याबाबतचा अंतिम आराखडा व करारनामा आगामी दोन आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सर्व परवानग्या आणि केंद्राचा निधी वेळेत मिळाल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिण्यापर्यंत एच. ए. मध्ये कोरोनावरील लस उत्पादन सुरु होईल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला.

सर्वपक्षीय नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा पुढाकार

‘एचए’ कंपनीत तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालावी असे आदेश आम्ही महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यावरच कंपनीने शहराबाहेर लस द्यावी, अशा अटीने करारनामा करावा. यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि संबंधित विभागांनी उचित कार्यवाही करावी. तसेच, आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात निधी थेट पद्धतीने ‘एचए’ कंपनीला द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सदस्य, शहरातील स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या पुढाकाराने आम्ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी आवश्यक असलेला हा एकमताने घेतला आहे, असेही सभापती लांडगे यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या