महत्वाची बातमी । पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांचे उद्या होणाऱ्या पालकमंत्र्याच्या बैठकीकडे लक्ष

पवनानागर (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या 19 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. 9 मे रोजी झालेल्या पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आमदार सुनील शेळके यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता पालकमंत्र्याच्या 19 मे रोजी च्या बैठकीच्या आश्वसनानंतर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. यामुळे पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांसह मावळ तालुक्यातील नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अहवालातील त्रुटी दूर करून अपेक्षित अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. यामध्ये कोणतीही कसुर राहता कामा नये यासाठी धरणग्रस्त प्रयत्नशील आहे याबाबत दि. 17 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अजय मोरे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, पुनर्वसन अधिकारी गीतांजली शिर्के, प्रांताधिकारी सुभाष भागडे, उपविभागीय अधिकारी जलसंपदा अशोक शेटे, तहसीलदार विक्रम देशमुख, मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पुनर्वसन वाटपासाठी क्षेत्र 1270 एकर जमीन असल्याचे सांगितले परंतु पवना अतिरिक्त संपादन 2714 एकर क्षेत्रापैकी धरण सुरक्षेसाठी लागणारे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्र वाटपासाठी घेण्याची मागणी धरणग्रस्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
अहवालानुसार पवना संपादन केलेली परंतु इतर ठिकाणच्या प्रकल्पासाठी वर्ग केलेले क्षेत्र खाजगी 301 एकर, वनविभागाच्या ताब्यात असलेल्या 304 एकर, खाजगी वन 301 एकर,
मूळ मालकांना देण्यात आलेले क्षेत्र 222 एकर, ओढे नाले करिता 117 एकर, धरण सुरक्षेसाठी 270 एकर, यापैकी धरण सुरक्षेसाठी लागणारे क्षेत्र ते पूर्वी केवळ 87 एकर क्षेत्र आवश्यक होते. त्यात वाढ करुन 270 एकर करण्यात आले आहे. याला धरणग्रस्तांनी आक्षेप घेतला आहे जास्तीत जास्त क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी धरणग्रस्तांनी कालच्या बैठकीत केली आहे.
यावेळी पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, मुकुंद काऊर, रविकांत रसाळ, बाळासाहेब मोहोळ, अँड संजय खैरे, मारुती दळवी किसन घरदाळे, बाळासाहेब काळे, राम कालेकर, दशरथ शिर्के, दत्ता घरदाळे आदी उपस्थित होते.