Breaking news

साहेब ! आम्ही घरी जायचं कसं ? आम्हाला घरी जाण्यासाठी रस्ता खुला करून द्या - भूशी सर्वे नं. 54/2 मधील रहिवाशांचे दोन दिवसांपासून लोणावळ्यात सुरू आहे उपोषण

लोणावळा : साहेब ! आम्हाला आमच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून द्या… आमच्या घराकडे जाणारा रस्ता एका बंगले धारकाने भिंत बांधून बंद केला आहे. सदरचा रस्ता मागील शंभर वर्षांपासून रेल्वे पाईप लाईन रस्ता म्हणून ओळखला जातो व तो रेल्वेच्या जागेत आहे. असे असताना आपली कोणतीही परवानगी न घेता शेजारच्या सर्वे नं. 53 मधील व्यक्तीने भिंत बांधत तो बंद केला असल्याचा आरोप भुशी सर्वे नं. 54/2 मधील रहिवाशी यांनी केला आहे. सदरचा रस्ता खुला करून द्या या मागणीसाठी 7 फेब्रुवारी पासून येथील रहिवाशी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे त्यांना उपोषणाला बसण्यासाठी मंडप टाकण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांना भर ऊन्हात बसण्याची वेळ आली आहे. मागील अनेक वर्ष हा विषय वारंवार पुढे येत असताना लोणावळा नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी त्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागत आहे. लहान मुले, वयस्कर नागरिक, महिला यांनी घरी जायचे कसे व घरातून बाहेर पडत मुख्य रस्त्यावर यायचे कसे असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. वारंवार पत्र व्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर हे नागरिक दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. एकतर न्याय द्या अन्यथा उपोषण करून जीव घ्या अशी भूमिका या नागरिकांनी घेतली आहे.

     लोणावळा तलावाच्या समोर असलेल्या सहारा पुलाच्या पूर्वेकडील बाजूला सदरचा सर्वे नं. 54/2 व सर्वे नं. 53 आदी मालमत्ता आहे. यापैकी सर्वे नं. 54/2 मध्ये मंजूर ले आऊट मध्ये 30 ते 35 कुटूंब आहेत. त्यांना जाण्यासाठी पूर्वीच्या रेल्वे पाईप लाईन चा रस्ता आहे. त्याच ठिकाणी लोणावळा नगरपरिषदेचा डीपी रस्ता देखील आहे. हा रस्ता शेजारील सर्वे नं 53 मधील डॉ. हकीम यांनी बंद केला असल्याचा सदर रहिवाश्यांच्या आरोप आहे. तर 2021 सालापासून लोणावळा नगरपरिषदेने काही वेळा डॉ. हकीम यांना सदर रस्त्यावरील भिंत काढत नागरिकांना रस्ता खुला करून द्या अशा नोटिसा बजावला आहेत. 2022 साली मा. उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने सदरचे बांधकाम काढण्याबाबत कारवाई करा असा आदेश लोणावळा नगरपरिषदेला दिला होता मात्र त्यावेळी असणारे मुख्याधिकारी यांनी चालढकल केल्याने नागरिकांवर आज आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. एक खाजगी व्यक्ती लोणावळा नगरपरिषद व रेल्वे प्रशासन यांची कोणतीही परवानगी न घेता रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे भिंत बांधते तरी दोन्ही प्रशासन कारवाई करत नसल्याने या दोन्ही प्रशासनाच्या विरोधात आम्ही नागरिक आमरण उपोषणाला बसलो असल्याचे विदुरा वर्तक यांनी सांगितले.

    याविषयी बोलताना मुख्याधिकारी अशोक साबळे म्हणाले, या विषयात सर्व कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. नागरिकांचा रस्ता खुला करण्याचा आमचा देखील प्रयत्न आहे मात्र सर्व आजूबाजूच्या जागा मालकांची बाजू समजावून घेऊन निर्णय घेतला जाईल. रेल्वे प्रशासनाला त्यांच्या जागेत बांधण्यात आलेल्या भिंतीबाबत उचित कारवाई करावी असे लेखी कळवले आहे. उपोषणकर्ते यांनी मागणी केलेल्या दोन्ही रस्त्यांबाबत न्यायालयात स्टे आहे. याकरिता कायदेशीर बाबी तपासून कारवाई केली जाईल. लोणावळा जागरूक नागरिकांनी आज उपोषणकर्ते यांची भेट घेत त्यांची बाजू मुख्याधिकारी यांना सांगितली तसेच उपोषणाला पाठिंबा दिला आहे.


इतर बातम्या