Expressway Accident l मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोटारीचा अपघात; 1 मयत तर 5 जण जखमी

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) किमी 43.400 येथे बुधवारी (26 जून) सायंकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास एका इर्टिगा मोटारीचा अपघात झाला. यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.
या अपघातात लहू कारभारी (रा. कल्याण जि. ठाणे हे मयत झाले असून जयदेश चौधरी (वय 39, चालक), संतोष भोईर (वय 55), दिनकर बापू पाटील (वय68), नरेश जाधव व मदन कारभारी (सर्व रा. कल्याण जि. ठाणे) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार इर्टिगा कार क्र (MH-05 EJ-8460) ही मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मोटर कार पहिल्या लेनच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी मयत झाले असून चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एम.जी.एम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती समजताच बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या अपघाताचा अधिकचा तपास खोपोली पोलीस करत आहेत.