लोणावळ्यातील नांगरगाव - भांगरवाडी रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुला; अभियांत्रिकी कामामुळे गेट 20 दिवस होता बंद
मावळ माझा न्युज नेटवर्क : रेल्वेच्या महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट नंबर 32 हा 16 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान बंद होता. 5 डिसेंबर पासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणेच्या महत्वाच्या कामासोबत गेटच्या दुतर्फा रस्ता काँक्रिटीकरण व रेल्वे मार्गामध्ये ब्लॉक बसवणे ही कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे गेटमध्ये व गेटच्या दुतर्फा रस्त्यावर पडणारे खड्डे हे कमी होणार आहेत. तसेच नांगरगाव च्या बाजूला साचणारे पाणी ही समस्या देखील सुटणार आहे. त्यामुळे भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांची समस्या सुटली आहे.
भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे दैनंदिन हजारो नागरिकांची ये - जा सुरू असते. नांगरगाव भांगरवाडी, कुसगाव, लोणावळा बाजारपेठ या भागात जाणारे स्थानिक नागरिक बहुतांश प्रमाणात याच मार्गाचा वापर करतात. तसेच पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे देखील गुगल मॅपच्या माध्यमातून याच मार्गे जात असल्याने भांगरवाडी रेल्वे गेटवर दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते परंतु जवळ जाण्यासाठी हाच महत्त्वाचा मार्ग असल्याने याचा सर्वाधिक वापर केला जातो. वीस दिवस गेट बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. मात्र आता रेल्वे गेटच्या दुतर्फ सिमेंटचा चांगला रस्ता झाला असल्याने व गेट वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.