Breaking news

मोरबे धरणातल्या साईराम धबधब्यात मुंबईच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

खालापूर (भक्ती साठेलकर) : अखंड महाराष्ट्र अतिवृष्टी आणि पूर परिस्थतीमुळे दुःखाच्या खाईत कोसळलेला असताना काही पर्यटक मात्र फक्त मज्जा करण्यात समाधान मानत आहेत. पावसाळी पर्यटनावर बंदी असताना देखील कोरोना नियमांच्या सूचनांकडे कानाडोळा करत 24 जुलै रोजी चेंबुर मुंबई येथील काही पर्यटक खालापूर येथील चौक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोरबे धरणातील साईराम धबधब्यात आले होते. धरणातून वाहणार्‍या धबधब्याच्या पात्रात हे पर्यटक बेधुंद होऊ उड्या मारत होते. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे त्या पात्रात भोवरा तयार झाला होता. राहुल जाधव (वय 32, रा. चेंबूर मुंबई) याने साधारणपणे 4 वाजण्याच्या सुमारास पात्रात उडी मारली आणि तो त्या भोवऱ्यात खेचला गेला, त्याला बाहेर काढण्याचे मित्रांनी प्रयत्न केले, मात्र सर्वांच्या डोळ्यासमोर राहुल पाण्यात दिसेनासा झाला.

    राहुल जाधव बुडाल्याचे लक्षात येताच,  उर्वरित पर्यटकांनी स्थानिकांच्या मदतीने चौक पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक  निरीक्षक युवराज सूर्यवंशी, पोलीस नाईक प्रसाद पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला राहुलचा शोध घेण्यासाठी पाचारण केले. स्थानिकांच्या मदतीने अपघाताची टीम अंधार होईपर्यंत शोध घेत राहिली, मात्र पहिल्या दिवशी अंधाराची अडचण  निर्माण झाल्याने शोधकार्य थांबवले गेले. दुसरे दिवशी सकाळीच अपघातग्रस्तांच्या टीमने शोधकार्य पुन्हा सुरु केले. त्याच दरम्यान राजेश पारठे यांनी राहुलचे शव  शोधल्यानंतर विजय भोसले, अनिल सावंत, बंटी कांबळे, जगदीश मरागजे, अमित गूजरे आणि स्थानिक ग्रामस्थ उमेश कदम यांनी ते बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

    मृत राहुल हा अवघ्या 32 वर्षाचा होता, तो देना बँकेचा कर्मचारी होता. राहुलच्या पश्च्यात त्याची पत्नी आणि अवघ्या 3 वर्षाची कन्या असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. शोधकार्यात कर्जतच्या पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सहज सेवा संस्थेने  देखील सहभाग घेण्याची तयारी केली होती. मात्र अपघातग्रस्तांच्या टीमला काही वेळातच यश आल्याने सर्वांचे कष्ट वाचले.  

    राहुल जाधवच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. पर्यटनावर बंदी असताना देखील मौज मजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने इतर पर्यटकांनी याचा बोध घ्यावा, पाण्यात नाहक धाडक करू नये असे आवाहन गुरुनाथ साटेलकर यांनी आवाहन केले आहे.

इतर बातम्या