आळंदीत गुरुवार पासून मिलिंद एकबोटे यांचे उपोषण; देशी गोवंश बचाव साठी जनआंदोलन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर गोभक्त माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे आणि सहकारी गोभक्त देशी गोवंशाचे संरक्षणार्थ तसेच राज्यातील गोशाळा यांना प्रति गायी 100 रुपये दैनंदिन अनुदान आणि गायींसाठी गायरान जमिनी मिळाव्यात या मागण्यांसाठी गुरुवार (दि. 19) पासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती गोभक्त माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांनी दिली.
येथील मारुती मंदिर गोपाळपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटे यांनी आपली भूमिका मंडळी. यावेळी गणेश हुलावळे, नवनाथ महाराज शिंदे, निलेश देशमुख यांचेसह गोशाळा चालक, गोभक्त उपस्थित होते. गायीचे संरक्षणासाठी उपोषण करत या देशी गोवंश बचाव जनआंदोलनच्या माध्यमातून प्रमुख मागण्यामध्ये देशी गोवंशासाठी प्रतिदिन, प्रति गोवंश शंभर रुपये अनुदान, राज्यातील गायरानाची जमिन गोपालन, चारा लागवड यासाठी उपलब्ध करून देणे, रस्त्यावरील मोकाट फिरणाऱ्या गोवंशाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना अशा मागण्याचा समावेश असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.
श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सुरु होत असलेल्या उपोषण आंदोलनात सर्वानी सहभागी होऊन गोवंश वाचविण्यास पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा चालक यांच्या वतीने उपोषण होत आहे. देशी गोवंशाची कत्तल होत असल्याने गोवंश कमी होत असल्याचे पशु जनगणनेत उघड झाले आहे. गोशाळांच्या अनेक समस्याच आहेत. त्यात आर्थिक समस्या देखील आहे. चारा, पत्रा शेड, गोपालक कामगार पगार, देखभाल दुरुस्ती, आरोग्य सेवा आदींचा समावेश आहे. सर्वत्र शेतीसह आरोग्यास उपयुक्त असलेल्या गोवंशाच्या संरक्षणास महाराष्ट्र शासनाने अनुदान देऊन गायींना राजाश्रय द्यावा तसेच देशातील इतर राज्या प्रमाणे जसे की, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत देशी गोवंशाच्या पालनास अनुदान दिले जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यांत देखील प्रगत राज्य असल्याने गायीचे संरक्षणार्थ अनुदान देण्यात यावे.
लाडकी गायी अनुदान देऊन योजना सुरु करा
महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देखील राज्यात देशी गोवंश वाचविण्यासह गोशाळा अनुदान देण्यासाठी तात्काळ निर्णय व्हावा. या मागणी साठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एकबोटे यांनी सांगितले. राज्यात आम्ही महायुतीचे समर्थक आहोत. गोमातेच्या आस्थे पोटी शासनाने याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्याय नसल्याने उपोषण करीत न्याय मिळविण्यासाठी दाद मागत आहे. राज्यात ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्याच धर्तीवर लाडकी गाय योजना अनुदान देऊन सुरु करावी अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. मिलिंद एकबोटे यांचेसह अनेक गोभक्त उपोषणास बसणार असू काही जण साखळी उपोषण करतील असेही त्यांनी सांगितले. गोरक्षक, गोचालक, गोभक्त, भाविक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.